तंत्रज्ञान वापरण्याचे फायदे:
सहज उपलब्ध: सध्याच्या इंटरनेटच्या युगात ही सर्व ॲप्लिकेशन्स व सॉफ्टवेअर सहजपणे उपलब्ध होतात. शिक्षकाकडे असलेल्या स्मार्टफोन पासून तर विविध प्रकारच्या लॅपटॉप, संगणक किंवा टॅब मध्ये ही सर्व ॲप्लिकेशन्स व सॉफ्टवेअर वापरता येतात.
ज्ञान भांडार: एखाद्या विशिष्ट बाबीं बद्दलचे भरपूर साहित्य इंटरनेट वर उपलब्ध असल्यामुळे विद्यार्थ्यांना व शिक्षकांना या सर्व ज्ञानाचा वापर करून अध्यापन व अध्ययन चांगल्या दर्जाचे करण्यास मदत होते.
कागद विरहित प्रक्रिया: तंत्रज्ञानाच्या वापराने म्हणजेच विविध एप्लिकेशन्स किंवा सॉफ्टवेअरच्या माध्यमातून अध्यापन केल्यामुळे शिक्षकाला व विद्यार्थ्यांना इतर कोणत्याही प्रकारच्या साहित्याची म्हणजेच पुस्तके, वह्या, पेन इत्यादी आवश्यकता भासत नाही.
वेळेची बचत: शिक्षकाने विद्यार्थ्यांना पाठवलेले साहित्य विद्यार्थी केव्हाही कधीही व कुठेही ही अभ्यासू शकतात. तसेच एका क्लिकवर शिक्षक एकाच वेळी पाहिजे तेवढ्या विद्यार्थ्यांपर्यंत हे साहित्य पाठवू शकतो. विद्यार्थीसुद्धा अभ्यास करताना आलेली अडचण त्वरित शिक्षकाला विचारून चांगल्या प्रकारे ज्ञान ग्रहण करू शकतो. शिक्षक एकाच वेळी अनेक विद्यार्थ्यांचे मूल्यमापन सहजपणे व कमी वेळेत पूर्ण करू शकतो.
संपर्क: e mail ,WhatsApp, Telegram, FB group, YouTube channel हे सर्व माध्यमांमधून शिक्षक सहजपणे विद्यार्थ्यांना संपर्क साधू शकतो तसेच विद्यार्थी सुद्धा शिक्षकांपर्यंत स्वतःच्या समस्या सहजपणे मांडू शकतात. या सर्व ॲप्लिकेशनच्या माध्यमातून शिक्षक व विद्यार्थी यांच्यामधील सहसंपर्क चांगला गेल्यामुळे अध्यापन व अध्ययन सुरळीतपणे व सहजपणे होण्यास मदत होते.
सहकार्याने शिक्षण: तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सुद्धा विद्यार्थ्यांचे वेगवेगळे गट करून किंवा विद्यार्थी एकमेकांना मदत करून चांगल्या प्रकारे ज्ञान प्राप्त करू शकतात. शिक्षकाने दिलेले वेगवेगळे प्रकल्पांवर विद्यार्थी एकाच वेळी एकत्र काम करून चांगल्या प्रकारे प्रकल्प पूर्ण करू शकतात. गुगल जॅमबोर्ड (Jamboard) हे याचे एक चांगले उदाहरण आहे. तसेच गुगल डॉक्स (Google Docs) सारख्या माध्यमाचा वापर करून विद्यार्थी एकत्रितपणे एखादा अहवाल तयार करू शकतात.
अभ्यासात व्यस्तता: ज्ञानाच्या माध्यमातून शिक्षक अभ्यासाचे साहित्य वेगवेगळ्या पद्धतींमध्ये म्हणजेच वाचनीय, व्हिडिओ, गेम्स, इंटरॅक्टिव्ह चाचणी (Quiz) किंवा इतर पद्धतीत विद्यार्थ्यांमध्ये पोहोचू शकतो जेणेकरून विद्यार्थी जास्त प्रमाणात अभ्यासात व्यस्त होऊन त्यांचे ज्ञान वाढेल व व त्यांच्या अभ्यासातली गोडी सुद्धा वाढेल.
व्यक्ती भेद: गूगल क्लासरूम, EDMODO सारख्या तंत्रज्ञानाचा वापर करून शिक्षक विद्यार्थ्यांच्या क्षमतेनुसार त्यांचे गट करून त्यांना वेगवेगळ्या पद्धतीने शिकू शकतो तसेच त्यांच्या क्षमतेनुसार त्यांच्या परीक्षा घेऊ शकतो. तंत्रज्ञानाच्या वापराने शिक्षकाला हे सहजपणे करणे शक्य होते. विद्यार्थ्यांच्या क्षमतेनुसार केलेल्या गटामुळे विद्यार्थ्यांचे सुद्धा अभ्यासातील आकलन खूप चांगल्या प्रकारे होते.
प्रत्याभरण/ प्रतिसाद: कोणत्याही प्रक्रियेमध्ये प्रत्याभरण किंवा प्रतिसाद हा विद्यार्थ्यांच्या जडणघडणीचा एक महत्त्वाचा भाग असतो. तंत्रज्ञानाच्या वापरामुळे शिक्षकाला विद्यार्थी निहाय प्रत्याभरण देण्यास सहज शक्य होते त्यामुळे विद्यार्थ्यांना स्वतःतील उनिवांचे आकलन होऊन त्यावर योग्य प्रकारे मात करून चांगल्या प्रकारचे ज्ञान मिळविण्यास मदत होते.
माहितीचे विश्लेषण: गुगल फॉर्म किंवा यासारख्या अनेक अप्लिकेशन चा वापर करून शिक्षकाला मूल्यमापन प्रक्रिया सहजपणे राबवता येते. परंतु याच बरोबर विद्यार्थ्यांनी दिलेल्या प्रतिसादाचे विश्लेषण गुगल फॉर्म सारखी एप्लिकेशन्स विस्तृतपणे करून देतात. त्यामुळे शिक्षकाला माहितीचे विश्लेषण सहजपणे व विना कष्टाने करण्यास मदत होते. विद्यार्थ्यांचे सरासरी गुण, जास्त गुण मिळवलेले विद्यार्थी, कमी गुण मिळवलेले विद्यार्थी, प्रश्न प्रमाणे उत्तर यांचे विश्लेषण, कोणते प्रश्न विद्यार्थ्यांना कठीण गेले व कोणत्या प्रकारचे प्रश्न विद्यार्थ्यांनी सहज सोडवले या सर्व गोष्टींविषयी चे विश्लेषण ही एप्लिकेशन्स सहजपणे करून देतात व याचबरोबर या सर्वांचे आलेख सुद्धा एप्लिकेशन्स उपलब्ध करून देतात. त्यामुळे शिक्षकाला विद्यार्थ्यांच्या विशिष्ट बाबींचे आकलन किती चांगल्या प्रकारे झाल्या किंवा नाही याचे मूल्यमापन या सर्व माहितीचे विश्लेषण करून सहज करता येते.